मधुमेही पाय – गंभीर पण टाळता येणारी समस्यावेळीच उपचार केल्यास पाय कापण्याची वेळ टळू शकते -डॉ. सेहर हमदुळे

जळगाव (प्रतिनिधी): मधुमेह हा दीर्घकाळ चालणारा आजार असून त्यातून उद्भवणाऱ्या गंभीर गुंतागुंतींपैकी एक म्हणजे मधुमेही पाय (डायबेटिक फूट). योग्य वेळी काळजी व उपचार न घेतल्यास या समस्येमुळे पाय कापण्याची वेळ येऊ शकते. मात्र, वेळेत उपचार आणि जागरूकता ठेवल्यास ही गंभीर समस्या मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते, असे मत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एम.एस. सर्जरी तज्ज्ञ डॉ. सेहर हमदुळे यांनी व्यक्त केले.
मधुमेह असलेल्या रुग्णांच्या पायांमध्ये जखमा, फोड, संसर्ग किंवा पाय काळा पडणे (गँग्रीन) अशी लक्षणे दिसून येतात. रक्तातील साखर दीर्घकाळ नियंत्रणात नसल्यामुळे पायातील नसांचे नुकसान होते, यालाच न्युरोपथी असे म्हणतात. त्यामुळे पायाला वेदना, उष्णता किंवा जखम झाली तरी रुग्णाला त्याची जाणीव होत नाही. त्यातच रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे जखमा लवकर भरून येत नाहीत व संसर्गाचा धोका वाढतो.
सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या जखमा पुढे मोठ्या व गंभीर स्वरूप धारण करतात. त्यामुळे काही वेळा पाय कापण्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र, दररोज पायांची स्वच्छता ठेवणे, पाय तपासणे, अनवाणी चालणे टाळणे, योग्य पादत्राणांचा वापर करणे आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, असे डॉ. हमदुळे यांनी सांगितले.
पायावर जखम, फोड, सूज, रंग बदल किंवा पू दिसल्यास तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरगुती उपाय, दुर्लक्ष किंवा उपचारास विलंब केल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. योग्य वेळी जागरूकता, नियमित तपासणी आणि वैद्यकीय उपचार घेतल्यास पायासह रुग्णाचे जीवनही सुरक्षित ठेवता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.



