
विद्यार्थ्यांनी शिकत-शिकत घेतले व्यवहारज्ञानाचे धडे
भुसावळ (प्रतिनिधी):काहूरखेडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवार, दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ व उपयुक्त वस्तूंचे स्टॉल लावून आपली कौशल्ये सादर केली.
मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सदस्य लतिका झांबरे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे, उपशिक्षक समाधान जाधव, उपशिक्षिका ममता तडवी, विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ तसेच माध्यमिक विद्यालय बोहर्डी येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले चाट, फरसाण, मिठाई, थंड पेये तसेच हस्तकला साहित्य विक्रीस ठेवून व्यवहारज्ञान, स्वच्छता, संघभावना व आत्मविश्वास यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विद्यार्थ्यांच्या स्टॉल्सना उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची गोडी निर्माण होत असून शालेय शिक्षणासोबत जीवनोपयोगी कौशल्ये विकसित होतात, असे मत उपशिक्षक समाधान जाधव यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक समाधान जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे यांनी केले. बाल आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी उपशिक्षिका ममता तडवी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



