जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

हरित ऊर्जा क्षेत्रात राज्यात मोठी गुंतवणूक हरित ऊर्जेमुळे वीजदरात कपात शक्य – महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र

जळगाव (प्रतिनिधी): राज्यातील एकूण वीजवापरामध्ये नवीकरणीय अर्थात हरित ऊर्जेचे प्रमाण सध्याच्या 13 टक्क्यांवरून 2030 पर्यंत 52 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येणार असून, हरित ऊर्जेवर भर दिल्यामुळे आगामी पाच वर्षांसाठी वीजदरात कपात करणे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.

मुंबई येथे आयोजित मुंबई एनर्जी वीकच्या अंतर्गत महाराष्ट्रातील हरित ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक या विषयावरील चर्चासत्रात ते मुख्य भाषण करताना बोलत होते.

लोकेश चंद्र यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांनी निश्चित केलेल्या ‘नेट झिरो’ उद्दिष्टानुसार 2030 पर्यंत नवीकरणीय ऊर्जेचा वापर 50 टक्क्यांपर्यंत वाढविणे आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या ऊर्जा परिवर्तन आराखड्यामुळे महाराष्ट्रात हे प्रमाण 52 टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याच्या दृष्टीने वेगाने होत असलेल्या विकासामुळे ऊर्जेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ही गरज लक्षात घेऊन महावितरणने संसाधन पर्याप्तता आराखडा तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी पाच वर्षांत राज्यातील ऊर्जा परिवर्तन आराखड्यासाठी सुमारे 3.3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, त्यातील सुमारे 75 टक्के गुंतवणूक खासगी गुंतवणूकदारांकडून होणार आहे. हरित ऊर्जा स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने महावितरणच्या वीज खरेदी खर्चात मोठी बचत होणार असून, त्यामुळेच पुढील पाच वर्षांसाठी वीजदर कपातीचा प्रस्ताव सादर करता आला असल्याची माहिती लोकेश चंद्र यांनी दिली.

राज्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असून त्यासाठी चार्जिंग पायाभूत सुविधा, डेटा सेंटर्स तसेच हरित हायड्रोजन प्रकल्प उभारले जात आहेत. या सर्वांसाठी लागणाऱ्या वाढीव वीज गरजेची पूर्तता करण्याची तयारी महावितरणने केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दिवसा निर्मित होणाऱ्या सौर ऊर्जेचा वापर सायंकाळी विजेच्या उच्च मागणीच्या कालावधीत करण्यासाठी बॅटरी स्टोरेज प्रकल्प तसेच जलविद्युत पंप स्टोरेज प्रकल्पांवर भर देण्यात येत असून, बॅटरी स्टोरेज, पंप स्टोरेज आणि ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात आगामी काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button