स्वामी एज्युकेशन ग्रुप रावेरतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

रावेर (प्रतिनिधी): स्वामी एज्युकेशन ग्रुप, रावेर तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रावेर येथील आंबेडकर चौक येथे महाराजांची मूर्ती स्थापित करून प्रतिमापूजन करण्यात आले. यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचेही पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रवींद्रजी पवार सर, संस्थेच्या सचिव मा. सौ. मनीषा पवार, माजी नगराध्यक्ष हरीशेठ गनवाणी, योगीराज दादा पाटील (जिल्हाध्यक्ष – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), अरुणजी शिंदे, प्रदीप शिंदे तसेच पत्रकार दीपक नगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात स्वामी एज्युकेशन ग्रुपचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जेंट्स व लेडीज शिक्षकांनी भव्य बाईक रॅली काढून संपूर्ण रावेर शहरात शिवजयंतीचा प्रेरणादायी संदेश दिला.
लहानग्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संस्थाध्यक्ष रवींद्रजी पवार सर यांनी आपल्या मनोगतात महाराजांच्या जीवनातील आदर्श, शौर्य, स्वराज्याची संकल्पना व कर्तृत्व यांचा उल्लेख करत प्रत्येकाने त्यांच्या विचारांतून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांना आपले दैवत मानणारे रवींद्रजी पवार सर दरवर्षी हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवितात, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण चौधरी यांनी प्रभावीपणे केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, प्रेरणादायी व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.



